मुंबई : कोरोनाच्या लढाईतील महत्त्वाचा टप्पास आज लसीकरणाच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. आज लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला सुरुवात होत आहे. राज्यात आज २८५ केंद्रावर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आज प्रारंभ होणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० या प्रमाणे २८ हजार ५०० लाभार्थ्यांना दिवसभरात लस दिली जाणार आहे, अशी माहिती राज्य लसीकरण विभागातर्फे देण्यात आली.
पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे डोस दिले जाणार आहेत. या टप्प्यात मोफत लसीकरण मोहीम राबवली जातेय. १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे.
यासाठी कोविन (Co-WIN) सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोबाईलवर मॅसेज पाठविला जाईल. या टप्प्यात लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. इलेक्शन कमिशन आणि इतर सरकारी डाटाच्या माध्यमातून सरकार स्वत: लाभार्थ्यांची निवड करणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांत आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी आहेत. तिसऱ्या टप्प्यात ५० हून अधिक वयांच्या व्यक्ती तसंच गंभीर आजाराशी झगडणाऱ्या व्यक्तींचा समावेश असेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरकारच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली असली तरी त्याचे गंभीर साईड इफेक्टस समोर आलेले नाहीत. तरीही सरकारनं जाहीर केलेल्या दिशानिर्देशांनुसार, एखाद्या व्यक्तीला लस घेतल्यानंतर हलका ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू शकते. साधारणत: कोणतीही लस घेतल्यानंतर अशी लक्षणे जाणवू शकतात. परंतु, यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असं आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलंय.
कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या फॅक्टशीटनुसार, १० टक्के लोकांना असा त्रास जाणवू शकतो. लशीचा डोस घेतल्यानंतर पहिला अर्धा तास सेंटरवरच राहावं लागेल. लसीकरणानंतर कोणत्याही पद्धतीच्या साईड इफेक्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगळे सेंटर बनवण्यात आले आहे.
सरकारच्या प्रोटोकॉलनुसार येथे आवश्यक ते उपचार दिले जातील. मदतीसाठी लाभार्थी १८०० १२००१२४ या क्रमांकावर २४x७ संपर्क साधू शकतात.
* ४ ते ६ आठवड्यांत दुसरा डोस
महत्त्वाचं म्हणजे, अद्याप लस बाजारात उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. लायसन्स मिळाल्यानंतर सरकारच्या मंजुरीननंतर बाजारात लस उपलब्ध होऊ शकेल. यासाठी आणखी दोन-तीन महिन्यांचा वेळ लागू शकेल.
लशीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांननंतर देण्यात येईल. लस बनवणारी कंपनी ‘सीरम इन्स्टिट्युट’ (SII) कडून ४ ते ६ आठवड्यांत दुसरा डोस घेण्याची सीमा निश्चित करण्यात आली आहे. सध्या कोव्हिशिल्ड लस घ्यायची की कोव्हॅक्सिन? असा पर्याय लाभार्थ्यांना मिळणार नाही. परंतु, लस बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर नागरिकांना हा पर्याय उपलब्ध असेल, असं सांगितलं जातंय.