मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर हिंदू कॉलनी येथील राजगृह निवासस्थानात झालेल्या तोडफोड प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या (वय २० रा. कल्याण) असे या आरोपीचे आहे. याआधी त्याचा साथीदार उमेश सीताराम जाधव (वय ३०) याला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. उमेश सीताराम जाधव हा दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे स्पष्टपणे दिसत होते. त्या आधारे शोध घेऊन उमेश याला अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. आता मुख्य आरोपी कचाट्यात सापडल्याने या हल्ल्यामागचे कारण उघड होणार आहे.
दरम्यान, ८ जुलै रोजी हिंदू कॉलनीमधील राजगृहाबाहेरच्या फुलझाडांची, कुंड्यांची नासधूस करण्यात आली होती. यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत राजगृहाच्या काचांचे नुकसान झाले होते. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून हल्लेखोरांनी पळ काढला होता. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले होते. या घटनेची गंभीर दखल घेत राजगृहजवळ लगेचच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राजगृहवरील हल्ल्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांनी यावर तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यातूनच ‘राजगृह’ वास्तूला यापुढे २४ तास पोलीस सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ‘राजगृह’च्या सुरक्षेचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रीमंडळ बैठकीत उपस्थित केला होता. त्यानंतर सुरक्षेबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला.