नागपूर : नागपूर जवळच्या बेला येथील मानस अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात बायोगॅसच्या टाकीत स्फोट होऊन पाच कामगार ठार झाले आहेत. ही भीषण दुर्घटना घटना आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटाने कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंगेश प्रभाकर नौकरकर (वय २१) , लीलाधर वामनराव शेंडे (वय ४७), वासुदेव विठ्ठल लडी (वय ३०), सचिन प्रकाश वाघमारे (वय २४) व प्रफुल्ल पांडुरंग मून (वय २५ ) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण वडगाव येथील रहिवाशी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचही जण कारखान्यात काम करीत असतानाच अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली व गोंधळ निर्माण झाला. स्फोटात पाच जण गंभीररित्या जखमी झाले होते. या जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून पाचही जणांना मृत घोषित केले.
वेल्डिंगचे हे काम सुरू असताना स्फोट झाला. स्फोट नेमका कशाचा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले एक वेल्डर आणि चार हेल्पर हे सर्व जण खासगी कंत्राटदाराचे कामगार होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक संजय पुरंदरे, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेला येथे धाव घेतली. स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.