बार्शी : केंद्रीय नागरी सेवा परिक्षेच्या निकालात बार्शी येथील अजिंक्य अनंत विद्यागर याने उत्तुंग यश मिळविले. त्याचा अखिल भारतीय यादीत 789 वा क्रमांक आला आहे. अजिंक्य येथील बी.पी. सुलाखे वाणिज्य महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक अनंत विद्यागर यांचे सुपुत्र आहे.
अजिंक्यची आई आशा या तालुक्यातील आगळगाव येथील लोकसेवा विद्यालयात मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. अजिंक्यच्या यशाची माहिती कळताच त्याच्या मित्र-परिवाराने एकच जल्लोष केला. त्याच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वयंअध्ययनावर भर देत आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांचेही मार्गदर्शन लाभल्याचे त्याने सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अजिंक्यचे प्राथमिक शिक्षण शिशु संस्कार केंद्र, माध्यमिक शिक्षण सुलाखे प्रशालेमध्ये तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्र विद्यालयात झाले आहे. अजिंक्यने पदव्युत्तर शिक्षण कला शाखेतील राज्यशास्त्र विषयात पुणे विद्यापीठात घेतले आहे. अजिंक्य हा सेट व नेट परिक्षेमध्येही उत्तीर्ण झालेला आहे.
त्याने पुणे विद्यापीठातील स्टडी सर्कलमध्ये स्पर्धा परिक्षांचा अभ्यास केला. यापूर्वी त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेतही यश मिळविले होते. युपीएससीसाठीचा हा त्याचा तिसरा प्रयत्न होता. याचवर्षी त्याची मोठी बहीण प्रियंका ही महाराष्ट्र लोकसेवा आयेागाच्या परिक्षेत यशस्वी होवून उद्योग अधिकारी झाली आहे. त्यानंतर अजिंक्यनेही मिळविलेल्या या दैदिप्यमान यशामुळे कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.