सातारा : सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या ड्रेनेजची स्वच्छता करताना टॉयलेटमध्ये स्वच्छता कामगारांना मानवी भ्रूण मृतावस्थेत सापडले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भ्रूण हत्या रोखण्याचे काम ज्या विभागातून व्हायला हवे, त्याच सिव्हिलमध्ये भ्रूण हत्येचा प्रकार घडल्याचे व्हिडीओद्वारे समोर आल्याने जिल्हा हादरला आहे. या संतापजनक प्रकारामुळे सातारा सिव्हिल प्रशासन कारभाराबद्दल सर्वसामान्य जनतेत चीड निर्माण झाली आहे.
वॉर्ड क्र. ५ मधील स्वच्छतागृहाच्या ड्रेनेजमध्ये ५ मानवी भ्रूण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला तीन दिवस उलटले तरी रुग्णालय प्रशासन त्याबाबत काहीही माहिती देण्यास तयार नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आणखी काही मृत अर्भके सापडण्याची शक्यता रुग्णालयीन सूत्रांनी व्यक्त केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सातारा जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या ड्रेनेजचा पाइप चोकअप झाल्यामुळे चोकअप काढण्यासाठी सफाई कामगारांना पाचारण केले होते. आठ दिवसापूर्वी हे काम सुरू असताना स्वच्छतागृहाच्या ड्रेनेजमध्ये तब्बल ५ मृत मानवी भ्रूण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही सर्व अर्भके सडलेल्या अवस्थेमध्ये सापडली आहेत.
विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयात १० पेक्षा अधिक वॉर्ड असून हे सर्व वॉर्ड सध्या कोविड केअर सेंटर म्हणून ओळखले जातात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. २४ तास या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा वावर असतानाही एवढी मोठी घटना जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने दाबून का ठेवली, याचे गौडबंगाल कळून येत नाही.
जिल्हा रुग्णालयात एक स्वतंत्र पोलीस चौकी असून गेल्या सहा महिन्यात या चौकीतील रजिस्टरमध्ये अर्भक पळवून नेले अथवा त्याचा मृत्यू झाला याबाबतची कसलीही नोंद नाही. मग ही सापडलेली अर्भके या ठिकाणी कशी आली?, या प्रश्नाचा फोड अद्याप झालेला नाही.
सातारा जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन आहे. महिलांच्या प्रसूतीसाठी दोन स्वतंत्र वॉर्ड आहेत तर अर्भकांसाठी सुसज्ज अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला येत असतात. शासनाने गर्भलिंग निदानावर बंदी घातली आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या मृत अर्भकांची संख्या पाहता जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
* प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
डॉ. आमोद गडीकर यांनी जिल्हा रुग्णालयाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रुग्णालयात अशा अनेक प्रकारांची मालिकच सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत अर्भक सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेच्या मुळाशी जायचे सोडून डॉ. गडीकर यांनी हे प्रकरण कसे दाबले जाईल, याकडेच अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे ते पुन्हा एकदा रडारवर येणार असल्याची चिन्हे आहेत.