नवी दिल्ली : शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ओवेसी यांना उत्तर दिले आहे. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने आता निर्णय दिलेला आहे. तेव्हा या निर्णयापुढे आता ओवेसी यांनी गप्प बसले पाहिजे, असे रिझवी म्हणाले. आम्ही सर्व भारतीय संविधानाच्या नियमांना बांधील आहोत आणि त्याच सुप्रीम कोर्टाने राम मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्त केला आहे, असेही रिझवी म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याला एमआयएमचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध दर्शवला, त्याला शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन सय्यद वसीम रिझवी यांनी असदुद्दीन ओवेसी यांना उत्तर दिले आहे. जर ओवेसी यांना काही त्रास असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे आणि त्यांनी भारतातील मुस्लिमांना शांतीने राहू द्यावे, असे वक्तव्य रिझवी यांनी केले आहे
ज्यांनी मंदिरे तोडली ते तुमचे पूर्वज होते, असे रिझवी यांनी ओवेसी यांना म्हटले आहे. ज्यांचे हक्क तुम्ही काढून घेतले, त्यांचे हक्क भारतीय राज्यघटनेने त्यांना दिले आहेत. हिंदू आणि मुस्लिमांचे रक्त वाहण्याचे राजकारण आता बंद करा आणि जिहादच्या नावावर मुस्लिमांना लढवू नका, असेही रिझवी यांनी म्हटले आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जायला नको होते, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. मोदी हे कुण्या विशिष्ट धर्माचे पंतप्रधान नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्टबरोबर ५ ऑगस्टची तुलना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोणाचा पराभव केला, हे मी विचारू इच्छितो, असा सवाल उपस्थित करत हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे, असे ओवेसी म्हणाले.