सोलापूर : मंगळवेढा येथील सबजेलमधून तीन कोरोना पॉझिटिव्ह आरोपींनी पलायन केले होते. यावेळी कारागृहात ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचा-यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोन पोलिसांना निलंबित तर तीन पोलिसांची पोलिस मुख्यालयात बदली केली आहे. पोलिस अधिक्षकांच्या या कारवाईमुळे कर्तव्यात कुचराई करणार्या पोलिस कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या वर्षभरात तीन वेळा आरोपी पळून जाण्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागनाथ डबरे, नामदेव कोळी या दोन पोलीस कर्मचा-यांना निलंबित केले तर अजित सुरवसे, अजित मिसाळ, अनिल दाते या तीन पोलीस कर्मचा-यांची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे.
मंगळवेढा उपकारागृहातून २० जुलै रोजी पहाटे ४ वाजता खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील व कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या या तीन कैद्यांनी सबजेलमधून धूम ठोकली होती. दोघांना जेल परिसरात पकडले तर तिसऱ्यास टाकळी सिकंदर (ता.मोहोळ) येथे पोलिसांनी अटक केली होती.
कारागृहात ड्यूटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशीसाठी तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे व चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची नेमणूक केली होती. त्यांच्या अहवालानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
* पार्टीप्रकरणी दोघांना यापूर्वीच निलंबित
मंगळवेढा सबजेल मधील कोरोना पॉझिटिव्ह कैदीस बेकायदेशीरपणे त्याच्या घरी नेऊन पार्टी करणा-या पोलीस कर्मचारी बजरंग माने, उदय ढोणे या दोघांना यापूर्वीच निलंबित केले आहे. त्यानंतर तीन कोरोना पॉझिटिव्ह व गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कैदी पलायन प्रकरणी नागनाथ डबरे, नामदेव कोळी या दोघांना निलंबित केले. त्या दिवशी सबजेलला ड्यूटीवरील अन्य अजित सुरवसे, अजित मिसाळ, अनिल दाते तिघांना पोलिस मुख्यालयात बदलीची कारवाई झाली आहे. निष्काळजीपणामुळे १५ दिवसात चौघांना निलंबित व्हावे लागले.
“कैदी पलायनप्रकरणी दोघांना निलंबित, तिघांना पोलीस मुख्यालयात बदलीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. कर्तव्यात कसूर करणा-या कोणचीही गय केली जाणार नाही”
– अतुल झेंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सोलापूर