नवी दिल्ली : केंद्राने राज्यांना, उद्योग आणि संशोधन संस्थांना संशयास्पद आणि अनपेक्षित बियाणांच्या पार्सलबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतात धोकादायक बियाणं पाठवण्याचा चीनचा कट असल्याचे समोर येत असल्याने केंद्र सरकारने इशारा दिला आहे. देशाच्या जैवविविधतेसाठी धोकादायक ठरू शकतात असे बियाणे यात असू शकतात, असं इशारा केंद्राने दिला आहे.
‘आपण आधीच चीनमधील कोविड -१९ साथीशी लढाई करत आहोत. आता जर बियाण्यांद्वारे साथीचा रोग आला तर ते हाताळणे कठीण होईल. आपल्याला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे’, असं कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या काही महिन्यांत अशा संशयित बियाण्यांचे हजारो पार्सल जगाच्या अनेक देशांत पाठवण्यात आले आहेत. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड, जपान आणि काही युरोपियन देशांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. ही पार्सल अज्ञात स्त्रोतांकडून पाठवली जात आहेत आणि त्यामध्ये दिशाभूल करणारी लेबल लावली जात आहेत, असं कृषी मंत्रालयाने निर्देशात म्हटलं आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) चीनच्या या कुरघोडीचे ब्रशिंग घोटाळा आणि कृषी तस्करी असे वर्णन केले आहे. संशयित बियाणे पार्सलमध्ये बियाणे किंवा रोगजनक असू शकतात. जे पर्यावरण, शेती आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका दर्शवते. अशी बियाणे पार्सल देशाच्या जैवविविधतेसाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच, सर्व राज्यांमधील कृषी विभाग, राज्य कृषी विद्यापीठे, बियाणे संघटना, राज्य बियाणे प्रमाणपत्र संस्था, बियाणे कॉर्पोरेशन आणि भारतीय कृषी संशोधन परिषद आणि त्यांच्या संस्थांना अशा संशयास्पद पार्सलपासून सावध राहण्याचा सल्ला केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिला आहे.