सांगली : भारत आणि श्रीलंकेत आढळणारे ‘इंडियन स्टार टॉरटॉइज’ या जातीचे दुर्मिळ कासव काल रविवारी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे आढळले. अनिल जाधव या शेतकऱ्याच्या शेतात आढळलेले कासव वनविभागाकडे सोपवण्यात आले. हे कासव तस्करीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात आले, की या परिसरात त्याचा अधिवास आहे याचा शोध वन विभागाकडून घेतला जात आहे.
‘इंडियन स्टार’ कासवाची प्रजाती अत्यंत दुर्मिळ असून हे कासव घरात ठेवल्यास घरात अथवा नोकरी धंद्यात प्रगती होते, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळे या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा दुर्मिळ जातीचे इंडियन स्टार कासव वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे अनिल जाधव यांना त्यांच्या शेतात सापडले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे कासव एक अतिशय सुंदर असून असामान्य आहे. भारत आणि श्रीलंकाच्या “ड्राय झोन” मधील प्रदेशात हे कासव आढळून येतात. भारतात आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, आणि पश्चिम बंगालमधील खेड्यांजवळील वनक्षेत्रात इंडियन स्टार कासव आढळतात.
वाटेगाव येथील अनिल शंकर जाधव यांना त्याच्या शेणे- वाटेगाव रोडलगत असणाऱ्या शेतात काम करत असताना दुर्मिळ ‘इंडियन स्टार’ जातीचे कासवाचे पिल्लू सापडले. अत्यंत देखणे असे हे कासव जाधव यांनी शिराळा वनविभागाशी संपर्क करून वन कर्मचारी अंकुश खोत यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी अंकित जाधव व दिनेश जाधव उपस्थित होते.