मुंबई : ‘सहकार, शिक्षण क्षेत्रातील कामाने समाजकारणात आणि जनतेत आदराचे स्थान मिळविलेले ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्री ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणात माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना आदराचे स्थान होते. त्यांनी पंढरपूर मतदारसंघाचे विधानसभेत दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. सहकारी साखर कारखाना, बँक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामाने त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना विनम्र श्रद्धांजली.
ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. लोकसेवेला, ग्रामीण विकासाला वाहून घेतलेले त्यांचे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपल आहे. राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान नेहमी स्मरणात राहील, परिचारक कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.