नवी दिल्ली : पुणे रेल्वे विभागात प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आली आहे. यावरून सोशल मीडियापासून ते राजकीय स्तरापर्यंत याची बरीच चर्चा होत आहे. दरम्यान, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण रेल्वेच्या प्रवक्त्याकडून देण्यात आले आहे.
यासंदर्भात रेल्वेच्या प्रवक्त्याकडून ट्विट करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे जंक्शनद्वारे प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 50 रुपये ठेवण्याचे उद्दिष्ट म्हणजे विनाकारण स्टेशनवर येणाऱ्या लोकांना रोखणे, जेणेकरून सोशल डिस्टंसिंगचे पालन करता येईल. कोरोना महामारीच्या पहिल्या दिवसापासून रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरांवर नियंत्रण ठेवत आहे, असे म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळातच रेल्वेने सुमारे 250 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत पाच पट वाढ केली आहे. रेल्वेने त्याची किंमत 10 रुपयांवरून 50 रुपये केली आहे. कोरोना व्हायरसमुळे स्थानकांवर गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.
* काँग्रेसची भाजपावर टीका
पुणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढविल्यानंतर सोशल मीडिया आणि राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढविल्यामुळे ट्विटद्वारे भारतीय जनता पार्टीवर (भाजपा) जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “काँग्रेस राज्यातील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट 3 रुपये होते, ते भाजपाच्या राजवटीत 50 रुपये झाले आहे.”