नवी दिल्ली : कोरोना अनलॉक 3 पासून लॉकडाऊनमध्ये ब-याचपैकी शिथिलता आली आहे. यामुळे काही प्रमाणात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. वाहतुकीच्या संबंधी मात्र अजूनदेखील जिल्हा अंतर्गतच वाहतूक सुरु आहे. यावरुनच राज्यातील आणि राज्याराज्यातील प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदीवरुन केंद्राने राज्यांना फटकारले आहे. ही बंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी प्रवासी व मालवाहतूक सुरु करण्यासंदर्भात पत्र लिहून निर्देश दिले आहेत. “केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अनलॉक-३ च्या नियमावलीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. राज्यातंर्गत वा राज्याराज्यातील वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन असायला नको,” असं स्पष्ट केलं आहे.
राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर प्रवासी वाहतुकीवर लादण्यात आलेल्या बंधनाचा परिणाम राष्ट्रीय स्तरावरील मालाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवरही झाला आहे. विस्कळीत व्यवहारांचा परिणामुळेच बेरोजगारी देखील वाढत आहे, असं भल्ला यांनी म्हटलं आहे.
भल्ला यांनी राज्यांना अनलॉक ३ नियमावलीचा संदर्भही दिला आहे. अनलॉक-३ नियमावलीतील पाचव्या परिच्छेदाचा उल्लेख करत म्हटलं आहे की, “प्रवासी आणि माल वाहतुकीवर कोणतीही बंधन असणार नाही. त्याचबरोबर शेजारील देशांशी करारानुसार सीमापार व्यापार करण्यासाठीही स्वतंत्र परवानगी व ई-परमिटची गरज भासणार नाही, असंही स्पष्ट केलेलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्हा प्रशासनासह विविध पातळीवर हालचालींवर निर्बंध लादले असल्याचे अहवाल केंद्राकडे आले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारे वाहतुकीवर बंधन घालण्यात आल्यानं त्याचा परिणाम वस्तू व मालाच्या पुरवठा साखळीवर होत आहे, असं भल्ला यांनी म्हटलं आहे.