मुंबई : शासन आदेशाने आंतरजिल्हा एसटी प्रवास चालू केला आहे. त्यात पासशिवाय एसटीने प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. मात्र या तीन जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे लोक एसटीने प्रवास करावयास घाबरत आहेत. परिणामी एसटी महामंडळाचाही तोटा होत आहे.
शासनाच्या सूचनेवरून एसटी महामंडळाने आंतरजिल्हा एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यानुसार सर्वत्र आवश्यक नियम पाळून एसटी धावत आहे. परंतु पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणाचा अजब आदेश तेथील जिल्हा प्रशासनाने काढला. त्यामुळे संबंधित जिल्ह्यात प्रवासी जाणे कमी झाल्याने महामंडळाला तेथील फेऱ्या निम्म्याने कमी कराव्या लागल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नागपूरहून तीन दिवसांपासून पुणे फेरी सुरू झाली आहे. प्रत्येक बसला २१ ते २२ प्रवासी असल्याने १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. तेथे या आजाराचा मोठा प्रादुर्भाव असला तरी विलगीकरणाचा नियम नाही. या तीन जिल्ह्यात मात्र कोरोनाच्या नावाखाली प्रशासन मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचे चित्र असून राज्यात एकसारखे नियम का नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.