सोलापूर / पंढरपूर : राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत आता सर्व स्तरातून आवाज उठू लागला आहे. जर राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडले तर विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल, मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकू नका, असं वारकरी संप्रदायाने म्हटलं आहे.
विठ्ठल मंदिर सुरु करण्यासाठी विश्व वारकरी सेना वंचितच्या मदतीने एक लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. सर्वच पक्षातील राजकीय नेते मंदिर उघडण्याबाबत आता आक्रमक होऊ लागले असताना, याबाबतचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इतर मंदिराच्या तुलनेने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पायावर दर्शन असल्याने याबाबत वेगळा प्रश्न उभा राहणार आहे. एखादा कोरोनाग्रस्त भाविकाने पायावर दर्शन घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या भाविकही कोरोनाची भीती राहू शकते. हे टाळण्यासाठी देवाच्या पायावर सॅनिटायझर फवारावे लागेल आणि यालाच वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला आहे.
मंदिर सुरु करण्याबाबत प्रशासन अजूनही साशंक असून सध्या कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता मंदिर उघडणे सध्या अवघड आहे. मात्र जर सरकारने आदेश दिले तर त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार दर्शन व्यवस्था सुरु केली जाईल, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचे म्हणणे आहे.
* मुखदर्शन घेऊ, सॅनिटायझर नको
कोरोनाचे संकट टाळण्यासाठी एकवेळ आम्ही कोरोनाची लस येईपर्यंत देवाचे मुखदर्शन घेऊ, पण पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मारु नये, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. ज्या पंढरपूरचे महत्त्व देवाच्या पायावरची दर्शनाने आहे ते बाजूला ठेवण्यास वारकरी संप्रदाय तयार झाला आहे. याचसोबत कोरोनाच्या संकटकाळात सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी भजन कीर्तनास परवानगी मिळावी ही आग्रही मागणी वारकरी करत आहेत.