कोल्हापूर : दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बारामतीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला परवानगी नसल्याने कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमवल्याच्या आरोपावरून राजू शेट्टी व त्यांच्या जवळपास ४०-५० कार्यकर्त्यांविरोधात बारामती शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला. या बद्दल राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून उद्धवा अजब तुझे सरकार.असे ट्विट करत, दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता, असा संतप्त सवाल केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दूध दरवाढ प्रश्नी मोर्चा काढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख ११ आयोजक व अन्य ४० ते ५० जणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावर राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
उद्धवा अजब तुझे सरकार!, असे ट्विट करत राजू शेट्टी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ”मोर्चामध्ये गाईचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करता. मग रेवनाथ काळे या राहुरीच्या शेतकऱ्याने दुधाला भाव नसल्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता.” असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रित जमाव जमवू नये, असे आदेश दिले असताना त्याचे उल्लंघन करत, मोर्चाला परवानगी नाकारली असताना तो काढत प्राण्यांचे हाल केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख ११ आयोजक व अन्य ४० ते ५० जणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी ओंकार कैलास सिताप यांनी याबाबत सरकारी फिर्याद दिली.