नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं सोमवारी निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने 7 दिवसांच्या दुखवट्याची घोषणा केली आहे.
उपचारादरम्यान अनेकदा त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडीकल बुलेटीन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. यानंतर मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. परंतू उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुखर्जी यांच्या निधनानंतर सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मुखर्जी हे भारतीय राजकारणातले अनुभवी नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व शासकीय इमारतींवरचा भारताचा तिरंगा झेंडा हा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच या काळात कोणत्याही पद्धतीचे शासकीय मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.
मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांचं पार्थिव हे राहत्या घरी आणलं जाईल. यानंतर काही काळासाठी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेले वातावरण लक्षात घेता सर्व नियमांचं पालन करुन शासकीय इतमामात मुखर्जी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.