सोलापूर : महापालिकेतील सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला उपस्थित असणा-या एका नगरसेवकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या सभेला उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, नगरसेविक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि गॅलरीत थांबलेले नागरिक यांना होम क्वारंटाइन करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. थोडक्यात सर्वांचेच टेन्शन वाढले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे यांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह आली आहे. आनंद चंदनशिवे यांनी मंगळवारी सभेला येण्यापूर्वी सकाळी अँटीजेन टेस्ट करुन घेतली होती. ही टेस्ट निगेटिव्ह आली. त्यामुळे ते सभेला हजर झाले. सकाळी ११.३० ते दुपारी एक वाजेपर्यंत ते सभागृहातच थांबून होते. या कालावधीत ते बराच भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. अधिकारी, पत्रकारांशी हितगूजही करीत होते.
* चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह
काही वेळानंतर आनंद चंदनशिवे सभेतून बाहेर गेले. घरी जाताच त्यांना अंगदुखीचा त्रास झाला. उपचारासाठी ते मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल झाले. या ठिकाणी त्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. टेस्टचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याचे चंदनशिवे यांनी माध्यमांना सांगितले. माझी प्रकृती चांगली आहे. लवकरच मी बरा होईन. कार्यकर्त्यांनी, मित्रांनी काळजी करु नये, असे आवाहन चंदनशिवे यांनी केले.
* पाच दिवसांसाठी होम क्वारंटाइन
दरम्यान, महापालिकेच्या सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या सभेला उपस्थित असलेल्या नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार आणि अधिकाऱ्यांची ऑक्सीमीटर, थर्मामिटरने तपासणी करुन सोडण्यात आले होते. या सर्वांची नावे, मोबाईल क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे. या सर्वांना पाच दिवसांसाठी होम क्वारंटाइन करता येईल का? या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.