मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात आठ महिन्यांनंतर कोरोनाच्या छायेत राज्यातील २२ जिल्ह्यांतील शाळांमध्ये आज सोमवारी पहिल्यांदाच ९ ते १२ वी पर्यंतचे वर्ग भरत आहेत. मात्र पाचशेवर शिक्षकांना कोरोनाची झालेली बाधा व दुसऱ्या लाटेची भीती यापार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पालकांनी संमतीपत्र भरून दिलेली नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात किती विद्यार्थी शाळेत येतात, याबाबत प्रश्नचिन्हच आहे.
बहुसंख्य शाळांची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र ३ जिल्ह्यांच्या प्रशानाने तूर्त शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह मराठवाड्यातील पाच तर विदर्भातील ८ जिल्ह्यात शाळांची घंटा वाजणार आहे. मुंबई, ठाणे ३१ डिसेंबर तर पुणे व नागपूर महापालिका क्षेत्रातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाहीत. तर नाशिकसह जळगाव, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होणार आहेत. वर्ग सुरू असलेल्ल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या घालण्यात येत आहेत.
* 22 जिल्ह्यात शाळा सुरु
पुणे (पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्र वगळून), कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद (ग्रामीण), बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नागपूर (ग्रामीण), यवतमाळ, गोंदिया, भंडारा, अकोला, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार या २२ जिल्ह्यांत शाळा सुरू झाल्या आहेत.
* घाई करू नका
मुलांना शाळेत पाठवण्यास पालक तयार नाहीत. पालकांमध्ये प्रचंड भीती आहे. त्यामुळे लस येईपर्यंत शाळा सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
“दिवाळीमध्ये झालेली प्रचंड गर्दी व गेल्या काही दिवसांपासून वाढणारे कोरोनाचे रूग्ण पाहता, अजून आठ – दहा दिवसानंतर कोरोना रूग्णवाढीचा अंदाज घेऊनच लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेतला जाईल. मात्र अद्याप तरी असा कुठलाही विचार नाही”
– अजित पवार, उपमुख्यमंत्री