नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच असे ‘अहंकारी’ सरकार सत्तेत आले आहे. या सरकारला अन्नदात्याची पीडा दिसत नाही, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्या म्हणतात, ‘लोकशाहीत जनभावनेची उपेक्षा करणारे सरकार आणि सरकारचे नेते दीर्घकाळ शासन करू शकत नाहीत. मात्र हे स्पष्टच आहे की, विद्यमान सरकारच्या ‘थकाओ और भगाओ’च्या नीतीपुढे आंदोलन करणार धरतीपुत्र शेतकरी, मजूर गुडघे टेकणारे नाहीत.’या बरोबरच तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचीही त्यांनी मागणी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लोकशाहीचा अर्थच जनता आणि शेतकरी-मजुरांच्या हितांचे रक्षण करणे असा आहे हे केंद्रातील मोदी सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे, असेही सोनिया गांधी यांनी पुढे म्हटलेले आहे.
* हाडे कापणारी थंडीत ३९ दिवसांपासून आंदोलन
हाडे कापणारी थंडी आणि पाऊस असतानाही दिल्लीच्या सीमांवर आपल्या मागण्यांसाठी गेल्या ३९ दिवसांपासून शेतकरी संघर्ष करत आहेत. त्यांची स्थिती पाहून देशातील नागरिकांप्रमाणे माझेही मन व्यथित झाल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रती सरकारची उदासीनता पाहून आतापर्यंत ५० हून अधिक शेतकऱ्यांचे प्राण गेले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर सरकारने उपेक्षा केल्यामुळे आत्महत्येचा मार्ग पत्करला. मात्र निर्दयी सरकारचे मन हेलावले नाही. तसेच आतापर्यंत पंतप्रधान किंवा कोणत्याही मंत्र्याच्या तोंडातून सांत्वनाचा एक शब्दही निघालेला नाही, असे सोनिया गांधी यांनी पुढे म्हटले आहे.
“आताही वेळ आहे, मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडून तत्काळ विनाअट तिन्ही काळे कायदे मागे घ्यावेत आणि थंडी आणि पावसात आपले प्राण गमावणाऱ्या शेतकऱ्यांचं आंदोलन समाप्त करावे. हाच राजधर्म आहे आणि दिवंगत शेतकऱ्यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल”
– सोनिया गांधी