मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना हे सध्या एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशींची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. या भेटीचा फोटो गडकरींनी ट्विट केलाय. यात गडकरी मनोहर जोशींना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. पण, या बैठकीत नक्की काय चर्चा झाली? हे अद्याप समोर आलेलं नाही.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज गुरुवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भाजप-शिवसेना युती इतिहासजमा होऊन महाविकास आघाडी हे नवं समीकरण राज्यात आकाराला आलं असताना दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांची झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री शासकीय अतिथीगृहावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्तानं मुंबईत असलेले गडकरी हे सकाळी जोशी सरांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथं पोहोचताच गडकरी यांनी सरांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्याशी गप्पाही मारल्या.
१९९५ साली राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले होते. मनोहर जोशी यांच्याकडं या सरकारचं नेतृत्व होतं. शिवसेनेचे ते पहिले मुख्यमंत्री होते. या सरकारमध्ये नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. याच काळात मुंबईत ५५ उड्डाणपूल व मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे उभारण्यात आला होता. राज्यातील उल्लेखनीय कामांमध्ये आजही या सगळ्याचा उल्लेख होतो.
युतीचे सरकार गेल्यानंतर मनोहर जोशी बरीच वर्षे खासदार होते. लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधीही त्यांना मिळाली. मात्र, वयपरत्वे ते आता राजकारणात सक्रिय नाहीत. तर, नितीन गडकरी हे दिल्लीच्या राजकारणात आहेत. क्वचित प्रसंगी कामानिमित्त ते मुंबईत येतात. मात्र, जुन्या नेत्यांशी असलेला त्यांचा स्नेह आजही कायम आहे, हेच या भेटीतून दिसून आले.