नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहेत. पण काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा ठाम निश्चय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांवर लादलेले तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधनदरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रॅक्टरसह हजारो शेतकऱ्यांनी रॅली काढून नागपूर राजभवनला घेराव घातला. इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व ऊर्जामंत्री नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री तथा प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, मदत, पुनर्वसन आणि बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बसवराज पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, खासदार बाळू धानोरकर, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. ‘मोदींनी काळे कायदे आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे. या कायद्यांमुळे साठेबाजी, महागाई वाढणार असून त्यातून उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात नफेखोरीची मुभा मिळणार आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचे काही नाही. पण केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे राहिलेले दिसत नाही. उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून हे कायदे बनवले आहेत’, असा आरोप थोरात यांनी केला.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, मोदी सरकार सातत्याने संसद आणि संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्रातील सरकारला सर्वसामान्य जनतेची नाही तर फक्त निवडक उद्योगपतींची चिंता आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचे नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी ताकद उभी केली आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत असून कायदे मागे घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नाही.