मुंबई : बहुचर्चित तांडव वेबसिरीजला भाजपने विरोध दर्शवला आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी आक्षेप घेतला आहे. या वेबसिरीजमध्ये हिंदू विरोधी कंटेंट असल्याचा आणि हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे तांडव वेबसिरीज बॅन करण्याची मागणी केली आहे.
मनोज कोटक यांनी सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना तसे पत्र लिहिलं आहे. त्याचबरोबर वेबसिरीजच्या निर्मात्याने माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तांडव वेबसिरीज ही एक पॉलिटिकल ड्रामा आहे. ही वेबसिरीज काहींच्या चांगलीच पसंतीला उतरत आहे. तर काहींच्या मते या वेबसिरीजद्वारे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोहम्म जिशान आयुब याच्यावर चित्रित एका दृश्यावरुन हा वाद रंगला आहे. या दृश्यामुळे हिंदू देवदेवतांचा अपमान झाला असल्याचा आरोप करत निर्मात्यांनी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी सोशल मीडियातून होत आहे. त्याचबरोबर या वेबसिरीजविरोधात हॅशटॅग मोहीमही राबवली जात आहे. ही वेबसिरीज अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केली असून, यात सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहेत.
दरम्यान, सैफ अली खान मुख्य अभिनेता असलेल्या या मालिकेतून हिंदू बांधवांच्या भावना दुखावण्यात आल्याची टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली असून त्या मालिकेवर बहिष्कार घालण्याची मागणी प्रेक्षकांना केली आहे. तांडव या मालिकेतून हिंदू देव देवतांचा अपमान झाल्याची कडवट प्रतिक्रिया नेटक-यांनी दिली आहे. मालिकेच्या माध्यमातून जेएनयुचे केलेले समर्थन, देवतांच्या तोंडी घातलेले वादग्रस्त संवाद यामुळे त्यावर नेटक-यांनी तोंडसुख घेतले आहे. क्रिएटिव्हीटी आणि कलेच्या नावाखाली प्रोप्रगंडा करण्याचे काम सुरु केले आहे. असेही काहींनी ही मालिका प्रदर्शित झाल्यावर म्हटले होते.
* काय आहे तो सीन?
तांडव वेबसिरिजमध्ये अभिनेता जीशाय अयूब हा नारदाच्या व्यक्तिरेखा असणाऱ्या व्यक्तीला म्हणतो की, ‘भगवान काहीतरी करा. सोशल मीडियावर भगवान रामाच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. मला वाटतयं की आपण काहीतरी वेगळी रणनीती तयार करायला हवी. त्यावर जीशान असे म्हणतो की, मग काय करू, बदलू का? त्यावर त्याला नारद म्हणतो की, भगवान तुम्ही खूपच भोळे आहात.
तांडव वेबसिरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान मुख्य भुमिकेत आहे. त्याचबरोबर डिंपल कापाडिया, गौहर खान, जीशान अयबू, सुनिल गोव्हर यांचा अभिनय पहायला मिळतो. या वेब सिरिजचे खास आकर्षण म्हणजे ही संपूर्ण वेब सिरिज सैफ अली खानच्या प्रसिद्ध अशा पतौडी पॅलेसमध्ये शुट करण्यात आली आहे.