जळगाव : जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील या विजयी झाल्या आहेत. अंजली पाटील यांच्या उमेदवारीरून गोंधळ देखील झाला होता. मात्र, हायकोर्टाने त्यांच्या उमेदवारीला मान्यता दिली होती. अंजली पाटील निवडणूक जिंकल्याने त्या आता जळगाव जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत.
सकाळी झालेल्या मतमोजणीतून वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील या विजयी झाल्या आहेत. त्या जिल्ह्यातील पहिल्या ग्रामपंचायत सदस्य ठरल्या आहेत. अंजली पाटील यांचा मागील पंचवार्षिक निवडणुकीत ११ मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी अर्ज भरल्यानंतर ‘लिंग’प्रकारापुढे ‘इतर’असे नमूद केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारला गेला.
खंडपीठात धाव घेतल्यानंतर स्त्री संवर्गातून निवडणूक लढविण्यास त्यांना परवानगी मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या प्रचारला जनमताचा कौल मिळाला. आज जाहीर झालेल्या निकालात त्या विजयी झाल्यात. भादली ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होताना सर्वांनाच याबाबत उत्सुकता हेाती. अखेर त्या विजयी झाल्या. त्याच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
* उमेदवारीवर घेतली होती हरकत
भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील (गुरू संजना जान) यांनी महिला राखीवमधून अर्ज भरला होता. मात्र, इतर उमेदवारांनी हरकत घेतल्याने तहसिलदारांनी महिला प्रवर्गातून त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेथून त्यांना महिला प्रवर्गातून अर्ज भरण्याची परवानगी मिळाली होती. यानंतर त्यांनी अतिशय जोमाने प्रचार केला.
‘लोकांनी दाखविलेल्या प्रेमामुळेच मी निवडून आले. आता गावातील समस्या जबाबदारीने सोडवून लोकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन”
– अंजली पाटील