मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या कार्याचा “वर्षभराचा लेखाजोखा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्याच पुस्तकाच्या मुद्द्यावरून प्रवीण दरेकरांना शरद पवारांनी खडेबोल सुनावले होते. शरद पवार कोणतीच गोष्ट सहज घेत नाही, माझंही पुस्तक चाळतील, असा विश्वासही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला होता. दरेकरांवर केलेली टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यांनी पवार यांना भावुक पत्र लिहिलं. या सगळ्या घटनाक्रमानंतर आता या दोन नेत्यांमध्ये आज भेट झाली आहे.
एका कार्यक्रमात आज शरद पवार आणि प्रवीण दरेकर यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं. दरेकर यांचं पुस्तक मिळालं नसल्याचं पवारांनी सांगताच दरेकरांनी तात्काळ पुस्तक सिल्व्हर ओकला पाठवले असल्याची माहिती आहे.
शेतकरी आंदोलनावरून टीका करणाऱ्या प्रवीण दरेकर यांचा शरद पवार यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला होता. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी थेट शरद पवार यांनाच सविस्तर पत्र लिहित या टीकेला उत्तर दिलं होतं. तसंच विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या एक वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा घेणारं पुस्तकही त्यांनी शरद पवार यांना पाठवले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शरद पवार साहेब अनुभवी नेतृत्व आहे. त्यांच्या काळातले अनेक किस्से त्यांनी सांगितलेत. सरकार बरखास्तीचा किस्सा सांगितला आणि माझ्या ज्ञानात भर पडली. त्यांच्या राजकीय जीवनातल्या अनेक गोष्टी सांगितल्या. आमच्यासारख्या नवोदित कार्यकर्त्यांना अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. कार्यक्रम संपल्यानंतर मी विचारलं की माझं पुस्तक मिळाले का?, पण त्यांना ते पुस्तक मिळालं नाही, असे त्यांनी सांगितले . माझं पुस्तक मिळण्याची ते वाट बघतायत, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मी लगेच माझं पुस्तक त्यांना सुपूर्द केले.
शरद पवार माझे पुस्तक नक्कीच चाळतील. त्यांना कामाच्या व्यापामुळे पूर्ण पुस्तक वाचता येईल की नाही हे माहीत नाही. पण ते पुस्तक नक्कीच चाळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.