मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. एकूण १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ७४ जणांचा मृत्यू रत्नागिरी, रायगड, सातारा जिल्ह्यात दरडी कोसळल्याने झाला आहे. तर ६० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. १०० च्या वर नागरिक बेपत्ता आहेत. १ लाख ३५ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. पश्चिम महाराष्ट्र व रत्नागिरीत आलेल्या महापुरामुळे मोठी आर्थिक आणि जीवितहानी झाली आहे. रायगड जिल्ह्यात रहिवाशांवर दरडी कोसळू लागल्या आहेत. या नैसर्गिक अतिवृष्टीमुळं व दुर्घटनेमुळं आतापर्यंत १४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० च्यावर अजूनही बेपत्ता आहेत. मदत व पुनर्वसन विभागानं ही माहिती दिली आहे.
मुसळधार पावसाने खेडमध्ये जगबुडी आणि नारिंगी नदीला महापूर येऊन शहर व ग्रामीण भागांची मोठी हानी झाली. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. बाजारपेठा पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाल्या. तर, महाडमध्ये सावित्री नदीचे पाणी शहरात शिरल्यामुळं पुराची परिस्थिती निर्माण झाली. रायगड व सातऱ्यात दरड कोसळून अनेक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. एनडीआरएफ व लष्कराकडून बचावकार्य सुरु आहे. मात्र पावसामुळं नद्यांवरील पूल तुटल्यामुळं बचावकार्यात अडथळे येत आहेत. यामुळेच मराठी अभिनेते भरत जाधव याने मदतीची पोस्ट करीत कोकण हे फक्त मज्जा करण्यासाठी नसून मदत करा, असे आवाहन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे एक लाख ३५ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. ३ हजार २२१ जनावरे दगावली आहेत. दुर्घटनेत ५३ लोक जखमी झाले आहेत तर १०० जण अद्यापही बेपत्ता आहेत.
गुरुवारी (ता.२२ )तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळून तेथील कुटुंबे मातीखाली गाडली गेली. येथील सुमारे ४२ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत ४० मृतदेह बाहेर काढण्यात आली असून दोन महिलांना वाचवण्यात यश आले आहे.आणखीही ४४ जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. खेडमध्येही दरड कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला.
पाटण तालुक्यात डोंगरकडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्यांखालून २१ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. याबरोबरच मृतांचा आकडा ३० वर गेला आहे. तर अजूनही १२ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.