सोलापूर : शिवसेनेचे मोहोळ येथील शिवसैनिक सतिश क्षीरसागर आणि विजय सरवदे यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज सोमवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.
शिवसैनिक सतिश क्षीरसागर आणि विजय सरवदे यांचा कट रचून खून झालेला असून ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे यातील दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. या खून प्रकरणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कोणकोण सहभागी आहेत याचा छडा लावावा आणि जलद गतीने तपास करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी यावेळी पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावर पोलिस अधिक्षक सातपुते यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे यात दोषी आढळतील अशा सर्वांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड, मयत शिवसैनिक सतिश क्षीरसागर यांचे वडील अर्जुन क्षीरसागर, आई विश्रांता क्षीरसागर, मयत शिवसैनिक विजय सरवदे यांच्या आई विमल सरवदे, मोहोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, शिवसेनेचे मोहोळ तालुका प्रमुख अशोक भोसले, तालुका संघटक नागेश वनकळसे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख महेश देशमुख, मोहोळ नगर परिषदेचे गटनेते महादेव गोडसे, विकास बनसोडे, नारायण क्षीरसागर आदी उपस्थित होते.