अक्कलकोट : पूर्वा नक्षत्राच्या पावसामुळे मंगळवारी संध्याकाळी तालुक्यातील दुधनीमध्ये ढगफुटी झाली. यामुळे दुधनी शहरातील अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने अनेकांच्या घर आणि संसार उघड्यावर पडले. या संदर्भात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गुरुवारी दुधनी नगर परिषदेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. MLA Kalyanshetty Siddharam Mhetre Akkalkot remove all encroachments on Dudhani Nalla without bias
या बैठकीस तहसीलदार बाळासाहेब सिरसट, अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, दुधनी न पा कार्यालयीन अधीक्षक चिदानंद कोळी यांच्या सह अक्कलकोट तालुका भाजपा अध्यक्ष मोतीराम राठोड, माजी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे उपस्थित होते.
यावेळी अनेक नागरिकांनी दुधनी शहरातील नाल्यावरील अतिक्रमणामुळेच पाणी गावात शिरल्याची तक्रार केली. यावर आमदार कल्याणशेट्टी यांनी पक्षापाती न करता नगर पालिकेच्या हद्दीतील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करून घ्या, अशी सक्त सूचना कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिली.
आमदार सचिन कल्याणशेट्टी हे गुरुवारी दुधनी शहरात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. मात्र त्याचवेळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आमदार कल्याणशेट्टी यांनी पुन्हा शनिवारी दुपारी दुधनीला येऊन संपूर्ण गावातील नुकसानीची पाहणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी भीमाशंकर अल्लापुर, कांतू धनशेट्टी, सिद्धाराम टक्कळकी, दौलत हौदे, बसवराज हौदे, हणमंत कलशेट्टीसह दुधनीतील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील अतिक्रमण संदर्भात २०१८ पासून पाठपुरावा, कारवाही नाही – शहरातील नाल्यावर वाढलेल्या अतिक्रमण संदर्भात २०१८ पासून लेखी तक्रार दाखल केली, मात्र नगर परिषद डोळेझाक करत असल्याची तक्रार बसवराज रायप्पा हौदे (दुधनीतील नागरिक) यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रेकडून नुकसानीची पाहणी
माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी बुधवारी सायंकाळी उपविभागीय अधिकारी सोलापुर क्र.२ चे प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार बाळासाहेब सिरसट, दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आतिष वाळुंज, मैंदर्गी न.पा. चे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्यासमवेत घरोघरी आणि बाजार पेठेतील व्यापाऱ्यांच्या दुकानात प्रत्यक्ष जावून पाहणी केली.
बाधितांना धीर देत नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, गुलाबसाब खैराट, लक्ष्मीपुत्र हबशी, चांदसाब नाकेदार, रामचंद्र गद्दी, गुरु हबशी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मुसळधार पावसामुळे दुधनी शहरातील छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, तरी त्यांना शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शांभवी फौंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई शंकरराव म्हेत्रे यांनी प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांच्याकडे निवेदनद्वारे केली. यावेळी शांभवी फौंडेशनचे महिला पदाधिकारी उपस्थित होते.