सोलापूर : स्वतः अध्यक्ष असलेल्या शिक्षणसंस्थेच्या शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी असणारे माजी महापौर मनोहर सपाटे यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी पोलीस ठाण्यास हजेरी लावण्याच्या अटीवर गुरुवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. Ex-Mayor Solapur Granted Interim Pre-Arrest Bail to Manohar Sapta
आता शुक्रवार आणि शनिवारी सपाटेंना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सपाटे यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते. गुरूवारी अॅड. शशी कुलकर्णी यांच्यामार्फत त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने सपाटे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
याप्रकरणात आरोपीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. गुरुदत्त व देवदत्त बोरगावकर, अॅड. विश्वास शिंदे, अॅड. बाबासाहेब सपाटे आणि मूळ फिर्यादीतर्फे अॅड. भडंगे यांनी काम पाहिले.
□ १२ लाख रुपये मिळवण्यासाठी १० लाख कोण देईल ?
सेवानिवृत्तीनंतर मिळणारी रक्कम देण्यासाठी सपाटे यांनी आपल्याकडून १० लाख रुपये घेतल्याचा आरोप पीडित महिलेने फिर्यादीत केला आहे. हा मुद्दा खोडून काढताना सपाटे यांचे वकील शशी कुलकर्णी यांनी सेवानिवृत्तीनंतरची १२ लाख रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी संस्थाप्रमुखांना १० लाख रुपये कोण देईल का ? असा सवाल न्यायालयात उपस्थित केला.
शिवाय सेवानिवृत्तीनंतरची रक्कम ही संबंधित शिक्षण विभागाकडून दिली जाते. त्यात संस्थेचा काही संबंध येत नाही. त्यामुळे संस्था प्रमुख म्हणून सपाटेंना १० लाख रुपये देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे अॅड. कुलकर्णी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ ट्रस्टचा हिशोब मागितल्याने दिली फिर्याद
पीडित महिला ही एका विश्वस्त संस्थेची विश्वस्त आहे. या संस्थेची देणगी पुस्तके पीडित महिलेकडेच आहेत. शिवाय पीडित महिलेनेच संस्थेची हुंडी परस्पर फोडून त्यातील हजारो रुपये गडप केले आहेत. त्याचा हिशोब मागितल्यानंतरही पीडितेने दिला नाही. म्हणून अध्यक्ष या नात्याने आरोपी सपाटे यांनी पीडितेला विश्वस्त पदावरून काढून टाकण्याची नोटीस दिलेली होती. ती कारवाई टाळण्यासाठी पीडितेने सपाटेंविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असल्याची बाबही अँड. शशी कुलकर्णी यांनी न्यायालयासमोर मांडली.
□ तुकाराम मस्केंना फटकारले
दरम्यान, सपाटे यांच्या जामिनाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र तुकाराम मस्के यांनी न्यायालयात वकिलामार्फत सादर केले. त्यावर तुकाराम मस्के कोण आहेत? अशी विचारणा केल्यानंतर मस्के स्वतः न्यायालयासमोर हजर झाले. संबंधित फिर्यादीशी तुमचा काय संबंध? तुमचे फिर्यादीमध्ये नाव आहे का? या न्यायालयाच्या प्रश्नावर मस्के यांना काहीच उत्तर देता आले नाही. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते पोलिसांकडे तपासात सांगा, असे सांगून मस्केंना न्यायालयाने फटकारले. त्याचवेळी त्यांचे प्रतिज्ञापत्रही दाखल करून घेण्यास न्यायालयाने नकार दिला.