चंदीगड : पंजाबमधील अनेक जिल्ह्यामध्ये विषारी दारू पिल्यामुळे जवळपास २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी ट्विट करुन दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.
त्यांनी ‘मी या प्रकरणी गुरदासपूर, अमृतसर आणि त्रन तरानच्या दंडाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. जालंधर विभागाचे कमिश्नर यांच्यावर या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते संबंधित एसएसपी पोलिसांशी समन्वय साधतील. जे कोण दोषी आढळून येईल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.’ असे ट्विट केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्या ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यास सांगितलं आहे. कारवाईसाठी विभागीय आयुक्तांना त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे.
दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार अमृतसर, बाटला आणि त्रन तरान जिल्ह्यात बुधवारी रात्री विषारी दारूमुळे अनेक मृत्यू झाले होते. २९ जुलैला पहिले पाच मृत्यू अमृतसरच्या तारसिक्का मधील मुच्चल आणि तांगा गावात झाले. त्यानंतर शुक्रवारी बाटला येथे ५ तर त्रन तरान मध्ये ४ मृत्यू झाले.
पोलिसांनी या प्रकरणी मुच्चल गावचा रहिवासी बलविंदर कौर याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जबाब घेण्याचे काम सुरु केले आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना शोध मोहीम सुरु करुन पंजाबमधील अनधिकृत दारू तयार करणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवळण्याचे निर्देश दिले आहेत.