मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपामध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते ‘मिशन घरवापसी’च्या मोहिमेचा प्रचार करत आहेत. यावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीला पार्थच्या वादाच्या संदर्भात, राष्ट्रवादीने आधी आपले घर सांभाळावे, नंतर भाजपाबाबत बोलावे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेलार म्हणालेत, राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या घरातले मतभेद लपवण्यासाठी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादीत परत येणार अशा अफवा पसरवते आहे. आपला पक्ष फुटू नये म्हणून राष्ट्रवादीचे नेते या अफवा पसरवत आहेत; पण त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळणार नाही. जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात संवाद साधला तरी खूप आहे, असा टोमणा त्यांनी मारला.
पण नुकतेच काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी पवारांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. हा फोटो सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमावर टाकला होता. यावर शेलार कमळ टाकून घड्याळ हातावर बांधणार अशी चर्चा सुरु झाली होती. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही भेट मतदारसंघातील अडचणीसाठी होती, असे सांगून राष्ट्रवादीची हवा काढून घेतली. पण आता पार्थ पवार प्रकरणात आशिष शेलार यांनी केलेली टीका म्हणजे शेलार हे भाजपातच राहणार हे ठळकपणे दिसून येत आहे.
आधी सरकार आणि स्वत:चा पक्ष वाचवा, असा टोमणा मारून शेलार म्हणालेत, भाजपाला ना कोणाचा परिवार फोडण्याची इच्छा नाही ना सरकार पाडापाडीत रस आहे. सध्या पार्थ पवार यांच्याबाबत वाद सुरू आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणालेत, पार्थ तरुण नेते आहेत. त्यांचा अनुभव कमी. त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्यासारखे नाही. तरुणांकडून चुका होतात, त्यात सुधारणा करता येतात.