मोहोळ/सोलापूर : मोहोळ – सोलापूर महामार्गावरील वस्तीवर काल गुरुवारी बिबट्या आला असल्याचे शेतक-यांनी सांगितले. आज शुक्रवारी वनविभागाने प्रत्यक्ष ठिकाणी येऊन पाहणी केली असता त्याने ठसे बिबट्याचेच असल्याचा दुजोरा दिला आहे. त्यामुळे मोहोळ परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. रात्री सहाच्यापुढे घराबाहेर पडू नये, अशा सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत.
मोहोळहून सोलापूरकडे जाणाऱ्या महामार्गापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर सीताराम गुरव यांच्या शेतामध्ये घर आहे. शेतामध्ये जनावरांच्या गोठ्याजवळच बांधलेल्या पाळीव कुत्र्याला भाकरी टाकण्यासाठी काल गुरुवारी रात्री नऊच्या दरम्यान सीताराम गुरव व त्यांची पत्नी घराबाहेर आल्यानंतर समोरच लाईटच्या उजेडात पाण्याच्या हौदावर बसलेला बिबट्या सीताराम गुरव यांना व त्यांच्या पत्नीच्या नजरेस पडला. बिबट्या दिसताच सीताराम गुरव यांनी मोठ्याने ओरडताच बिबट्याने त्यांच्याकडे पाहात गुरगुरत धूम ठोकली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना कल्पना देताच त्यांनी रात्रीच पोलिस व्हॅनद्वारे घटनास्थळावरून फेऱ्या मारत नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या. आज शुक्रवारी सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी वनपाल डी. डी. साळुंखे व वनपाल डी. डी. कांबळे यांनी पाहणी केली असता, संबंधित ठसे हे बिबट्याचेच असल्याचे त्यांनी खात्रीलायक सांगितले.
दोन दिवसांपूर्वी याच परिसरातील शिवाजी गुरव या शेतकऱ्याची बाहेर बांधलेली शेळी रात्री गायब झाली होती. दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील पाटकुल परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला होता. आता मोहोळ-सोलापूर महामार्गापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर व लोकवस्तीपासून अतिशय जवळच बिबट्याचा वावर आढळल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.