मुंबई : सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून, सीबीआयला हवं ते सहकार्य सरकारकडून करण्यात येईल, असं त्यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी होत असताना अनिल देशमुख ठामपणे मुंबई पोलिसांच्या पाठीशी उभे राहिले होते. यावेळीही त्यांनी ‘मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून न्यायालयानंही तपासात दोष आढळला नसल्याचं म्हटलं आहे आणि मुंबई पोलिसांसाठी ही अभिमानाची बाब आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी विरोधी पक्षातील नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारमध्ये लवकरच निवडणूका होणार आहेत त्या अनुषंगानेचं राजकारण केले जात आहे,’ असाही पुनरुच्चार त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार करणार का हा प्रश्न विचारला असता, त्यांनी याबाबत उत्तर देणं टाळलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांची पाठराखण केली होती. मुंबई पोलीस या प्रकरणाचा व्यावसायिक पद्धतीनं तपास करत आहेत. सर्व बाजू तपासून पाहिल्या जात आहेत. त्यामुळं सीबीआय तपासाची गरज नाही, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबतीत कुणीही राजकारण करू नये, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं होतं.