टेंभुर्णी : कोरोनाच्या भयामुळे अवघे जग त्रासलेले असताना शासनाने नागरिकांच्या अँटीजन रँपीड टेस्ट करुन घेण्याचे सत्र राबविले असले तरी कोरोनाच्या भीतीमुळे चाचणी करण्यासाठी नागरिकांतून प्रतिसाद मिळत नाही. अशात मात्र काल शुक्रवारी बेंबळे येथोल एका नवदापंत्याने लग्नमंडपातून थेट आरोग्य केंद्र गाठले. अँन्टीजेन रँपीड टेस्ट केल्यानंतरच गृहप्रवेश केला. यामुळे नवदाम्पत्याचे सर्वञ कौतुक केले जात आहे.
बेंबळे येथील बापु सोपान शिंदे यांचे चिरंजीव शंभु याचा विवाह इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे मधुकर गोपाळ शिंदे यांच्या श्रावणी या मुलीशी झाला. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडला. लग्न सोहळा उरकून घरी परतत असताना बेंबळे येथे गावी आल्यानंतर घरी जाण्याऐवजी थेट बेंबळे येथील प्राथमिक उपकेंद्रात वधू वर दाखल झाले.
या केंद्रात परिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. भारती आपल्या टीमसह कोरोना चाचणी घेत होत्या. नवरा – नवरी लग्नमंडपातून या आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करण्यासाठी आले आहेत, असे समजल्यानंतर सर्व गावक-या समक्ष त्यांची अँन्टीजेन रँपीड टेस्ट (कोरोना चाचणी) घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी कुर्डुवाडी पंचायत समितीचे माजी सभापती बंडुनाना ढवळे उपस्थित होते. त्यांनी या शिंदे नवदापंत्याचे कौतुक केले. कोरोना चाचणी करणे किती गरजेचे व महत्वाचे आहे हे पटवून सांगितले. सर्व नागरिकांनी स्वतः पुढे आले पाहिजे. या नव वरवधूने आपल्या पुढे एक आदर्श ठेवला असून या कोरोना चाचणीचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. आपल्या परिसरात जास्तीत जास्त अँन्टीजेन रँपीड टेस्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देवू, अशी ग्वाही बंडुनाना ढवळे यांनी दिली.
यावेळी विजय खटके, सचिन पवार व गावातील दुकानदार, भाजीविक्रेते, हॉटेलचालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही चाचणी व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ.भारती, आरोग्यसहाय्यक पी.एस. पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व्ही.डी.वास्ते, महेश शिंदे, आरोग्यसहाय्यिका शोभा पवार, कोरे आदींनी परिश्रम घेतले.