टेंभुर्णी : महाराष्ट्रात पाणीसाठवण क्षमतेत मोठ्या (१२३ टीएमसी) असलेल्या उजनी धरणात मागील वीस दिवसापासून पुणे जिल्ह्यासह भीमा खो-यात पाऊस पडत आहे. या पावसाने उजनी धरण साखळीतील बहुतांशी धरणे भरली आहेत. पावसाची संतत धार सुरु असल्याने उजनी धरण साखळीतील १९ पैकी ६ धरणांतून सुमारे १० हजार धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भीमा व भिमेच्या उपनद्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे दौंड येथे उजनीत येणारा प्रवाह ३५ हजार ४६३ क्यूसेक्स असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनीचा पाणी साठा झापाट्याने वाढत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शनिवारी दिवसभरात उजनीचा पाणीसाठा १०३.८२ टीएमसी झाला आहे. तर पाण्याची टक्केवारी ७५ टक्क्यांवर पोहोचला असून एकूण धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी १७ टीएमसी पाण्याची गरज आहे. आज उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे धरण लवकरच १०० टक्के भरण्याची आशा आहे.
सध्या भीमा खो-यात पावसाची संततधार कायम असून पुणे जिल्ह्यांतील धरणांची साठवण क्षमता कमी झाल्याने उजनीत पाणी मोठ्या प्रमाणात येऊ शकते.आज सायंकाळी उजनीत ३५ हजार ४६३ क्युसेक्सने पाणी जमा होत होते.त्यात घट होऊन राञी नऊ वाजाता ३२४६४ क्युसेक्स पाणी जमा होत आहे.अशीच पाण्याचा विसर्ग राहिला तर येत्या ४ ते ५ दिवसात उजनी धरण १०० टक्के भरण्याची अपेक्षा आहे.
* संगम येथे भिमापात्रात १७ हजारांचा विसर्ग
निरा खोऱ्यातील वीर, गुंजवणी, भाटघर धरणातून निरा नदीत पाणी सोडण्यात आल्याने निरा-भिमा संगम येथे भिमानदीत १७ हजार ८३० क्युसेकचा विसर्ग तयार झाला आहे. यामुळे भिमानदी दुथडी भरून वाहत आहे. आगामी तीन ते चार दिवसांमध्ये उजनीतून ही भिमानदीत विसर्ग सुरू होवू शकतो. यामुळे पुरसदृष परिस्थिती निर्माण होवू शकते. संभाव्य पुराचा फटका नदीकाठच्या गावांना बसू नये यासाठी प्रशासन दक्ष झाले असून वेगाने हालचाली सुरू आहेत. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी काठच्या गावांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. एकंदरीत उजनी धरण भरत असल्याचा आनंद होत असला तरी पुराची भीती मात्र या परिसरातील नागरिकांमध्ये आहे.
*उजनी धरणातील
पाणीपातळी राञी ९ वा.(22 अॉगस्ट)
एकूण पाणीपातळी – ४९५.६४० मीटर
एकुण पाणीसाठा – १०३.८२ टी.एम.सी
उपयुक्त साठा – ३९.८२ टी.एम.सी.
टक्केवारी – ७४.९७ टक्के
उजनीत येणारा विसर्ग
दौंड – ३२४६४ क्युसेक्स
बंडगार्डन – १८,९७० क्युसेक्स
भिमापात्र विसर्ग
नरसिंगपूर (संगम) – १७,८३० क्युसेक्स
पंढरपूर – १२,४३० क्युसेक्स
संकलन : संतोष वाघमारे – टेंभुर्णी, सुराज्य डिजिटल