सांगली : मुंबई शहरातील मृत्यूदर 5.42 इतका आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक मृत्यूदर सांगली जिल्ह्याचा आहे. 24 दिवसात 267 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 3.96 टक्क्यांवर पोहचला आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे. दुसऱ्या बाजूला एकूण रुग्णसंख्येतील बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून 61.12 टक्क्यांवर गेले आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या 24 दिवसात झपाट्याने वाढ झाली आहे. 31 जुलै रोजी एकूण रुग्णसंख्या 2 हजार 643 इतकी होती. त्यावेळी त्यातील 78 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यावेळी मृत्यूदर 3.47 टक्के होता. गेल्या 24 दिवसांत 6 हजार 51 रुग्णांची संख्या वाढली असून मृत्यूची संख्या 345 वर पोहचली आहे. सध्याचा मृत्यूदर चिंता वाढवणारा ठरत आहे.
मृत्यूमध्ये वृद्धांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. चाळीसच्या आतील तरुणांचे मृत्यूही झाल्याचे दिसून येत आहे. काल मंगळवारी दिवसभरात उच्चांकी 25 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील रुग्णांची संख्या अधिक दिसून आली. सद्यस्थितीत चारशेहून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 75 जण व्हेंन्टिलेटरवर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 353 जण ऑक्सिजनवर आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पर्यायी व्यवस्था उभारण्याची गरज
मुंबईपाठोपाठ सांगली जिल्ह्यात मृत्यूदर अधिक आहे. गेल्या 24 दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या दिवसागणीक वाढत असून रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहे. उपचारासाठी रुग्णालयात जाग मिळत नाही. त्यामुळे उपचाराविना रुग्णांचे हाल सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका रुग्णालयाबाहेर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तरूणाचा जीव गेला. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.
* असा आहे मृत्यूदर
मुंबई शहरात 1 लाख 37 हजार 96 इतकी रुग्णसंख्या असून त्यापैकी 7 हजार 442 रुग्णांचा मृत्यू झाला. हा मृत्यूदर 5.42 इतका आहे. ठाणे विभागात मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरभाईंदर पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल हे भाग येतात. या साऱ्याची रुग्णसंख्या 3 लाख 11 हजार 66 इतकी आहे. त्यापैकी 12 हजार 279 जणांचा मृत्यू झाला. त्याची टक्केवारी 3.94 इतकी आहे. नाशिक विभागात 80 हजार 879 रुग्णसंख्या असून मृत्यू 2008 आहेत. त्याची टक्केवारी 2.48 आहे.
पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या 1 लाख 52 हजार 511 इतकी असून त्यापैकी 3 हजार 765 जणांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू दर 2.46 टक्के इतका आहे. कोल्हापूर विभागात सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यूदर 2.65 टक्के इतका आहे.