मुंबई : मंदिरे उघडण्यासाठी वारकरी सेनेसह वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरातील तीर्थक्षेत्र पंढरपुरात मोर्चा आंदोलन होत आहे. यात जिल्हा प्रशासनाची दमछाक होत असून ग्रामीणमधील वाढत्या कोरोनाच्या काळात या आंदोलनामुळे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला आहे. यावरच शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांवर सौम्य भाषेत टीका केली आहे.
”पंढरपूरला प्रकाश आंबेडकर यांनी जी गर्दी जमवली आहे, मला वाटत हे चित्र सकारात्मक नाही. चांगलं नाही. वारकरी संप्रदायाशी आमची चर्चा झाली आहे. पण सोशल डिस्टनसिंग यामध्ये महत्वाचे आहे त्याचा पूर्ण फज्जा मंदिराबाहेर उडालेला दिसतो आहे. त्यातून संक्रमण वाढू शकते. प्रकाश आंबेडकर संयमी नेते आहेत, कायद्याचे जाणकार आहेत. अशा व्यक्तीने आरोग्य विषयक आणीबाणी असताना कायदेभंगाची भाषा करणे म्हणजे लोकांना उचकवण्यासारखे आहे,” अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे मंदीर सुरु करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केले आहे. त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, “मंदीरे बंद ठेऊन कुणाला आनंद होतो आहे, असे नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार टप्याटप्याने अनेक गोष्टी सुरू करते आहे. लवकरच मंदिराचा विषय घेतला जाईल. रेल्वेचाही विषय येतो आहे. पण विरोधी पक्षांनी सुद्धा राज्याच्या हितासाठी संयम बाळगला तर राज्याच्या जनतेवर उपकार होतील.” आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी चर्चा करावी. मात्र, लोकांना वेठीस धरून आंदोलन करू नये, तणाव निर्माण करू नये, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.
राज्यातील मंदीरे सुरु व्हावीत यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले. त्याचाही आंबेडकर यांनी समाचार घेतला. भाजपच्या आंदोलनात ‘सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले ते आपण पाहिले आहे, असे राऊत म्हणाले.
* अभिनेत्री कंगनावर राऊत भडकले
अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत त्यांची सुरक्षा नाकारली आहे. त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, “कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळे आवरावे. आपल्या राज्यात जावे. हा काय तमाशा चालला आहे? राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर तडतड उत्तर दिले पाहिजे. मग ते कोणीही असे ना. या राज्यावर, पोलिसांवर यांचा विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर ही मोठी बेईमानी आहे.”
मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी विषय गांभीर्याने घेतलं पाहिजे, असे सांगून राऊत म्हणाले, “अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे . देवेंद्र फडणवीस या आधी राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी मुंबई पोलीस किंवा राज्याचे प्रशासन त्याबाबत अविश्वास दाखवणाऱ्यांना पाठिंबा देऊ नये.