सांगली / मुंबई : सध्या महाराष्ट्रात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं आहे. राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप प्रत्यरोप चालूच आहेत. ‘राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू’ असं माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले होते. त्यास माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांना आंदोलन फसल्यांने पिसाळलेला असल्याची घणाघाती टीका केली आहे.
महायुतीच्या वतीनं सध्या राज्यभर दूध दरवाढ मागणीसाठी आंदोलन चालू आहे. या आंदोलनावरूनच राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधत ‘हे आंदोलन म्हणजे कोंबडी चोरीचं आंदोलन असलेल्या व्यक्तींनी केलेलं आंदोलन’, असं म्हटलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राजू शेट्टी यांनी केलेल्या या टीकेवर पलटवार करत सदाभाऊ खोत म्हणाले, ‘राजू शेट्टी हा आता काजू शेट्टी झाला आहे. या माणसाला आता कोणीच किंमत देत नाही. तसंच त्याची अवस्था आता गावात सोडलेल्या वळूप्रमाणे झाली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्याप्रमाणे सोडलं आहे. मला कोंबडीचोर म्हणणाऱ्या राजू शेट्टींनी चारशे एकर जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. तसेच जाईल तिथे खंजीर खुपसणारे राजू शेट्टी बारामतीमध्ये आमदारकीसाठी पाय चाटायला गेले. मात्र राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिली नाही, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
सदाभाऊ खोत हे नैराश्येतून भ्रमिष्टासारखे आरोप करत आहेत, आंदोलन फसल्यामुळे ते पिसाळल्यासारखे वागत असल्याचं प्रत्युत्तर राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना दिलं आहे. त्यामुळे दूध दर आंदोलनावरुन पुन्हा एकदा सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी आमनेसामने आले असल्याचं दिसत आहे.