मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना तब्बल २३ दिवसांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बिग बींचा कोरोना रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती अभिषेक बच्चनने ट्विट करत दिली.
बिग बींचा कोरोना रिपोर्ट ११ जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच दिवशी रात्री त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबियांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात अभिषेक बच्चनचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
११ जुलै रोजी अभिषेक बच्चनलाही नानावटीमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान अभिषेकने ट्विट करत सुदैवाने माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आता घरीच आराम करतील. तुम्हा सर्वांनी केलेल्या प्रार्थनांबद्दल तुमचे मनापासून आभार, असे म्हटले आहे. पण अद्याप अभिषेक बच्चन रुग्णालयातच आहे.
अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. २७ जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आणि त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. आपल्या जुहू येथील जलसा बंगल्यावर ते पोहोचले आहेत.